14.3 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeसंपादकीयजय जय.. पराजय!

जय जय.. पराजय!

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (८ ऑक्टोबर) लागले. यात हरियाणाचे निकाल अनपेक्षित ठरले. भाजपने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत सलग तिस-यांदा सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्याचा चमत्कार करून दाखवला. केंद्र सरकारने लादलेल्या नव्या कृषि कायद्याच्या विरोधात आणि किमान आधारभूत किंमत यासाठी हरियाणातील शेतक-यांनी दीड वर्ष आंदोलन केले होते. शिवाय कुस्तीपटूंचे आंदोलन झाले होते. या दोन्हींचा भाजपला फटका बसून काँग्रेसची सत्ता येईल असे वातावरण होते. मतदानोत्तर चाचण्यातही काँग्रेसला कौल मिळाला होता.

परंतु या आंदोलनाचा कुठलाही प्रभाव मतदारांवर दिसला नाही. उलट भाजपच्या जागा वाढलेल्या दिसल्या. जम्मू-काश्मीरमध्ये मात्र भाजपचा पराभव झाला. म्हणजे त्यांची एका डोळ्यात हासू तर दुस-यात आसू अशी स्थिती झाली. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)-काँग्रेस युतीने बाजी मारली. एनसीला ४२ तर काँगे्रसला ६ जागा मिळाल्या. २०१४ मधील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला यावेळी ६ जागांचे नुकसान झाले. भाजपला ४ जागा अधिक मिळाल्या. यावेळी त्यांना २९ जागा मिळाल्या आहेत. शिवाय त्यांचा स्ट्राईक रेटही चांगला आहे. जम्मू-काश्मीर निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती केली होती. राहुल गांधी यांचे नेतृत्व हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यांत अपयशी ठरल्याचे म्हटले जात आहे. हरियाणा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार असे भाजपद्वारा मनाचे मांडे रचले जात आहेत.

या निकालाने भाजपाचे मनोधैर्य वाढले असून महाविकास आघाडीला फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु मतदारांच्या मनात काय आहे ते कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात. जम्मू-काश्मीर निवडणुकीत एनसी-काँग्रेस युतीला ४८ जागा मिळाल्या. २०१४ मध्ये सत्तेत असलेल्या मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाला फक्त ३ जागा मिळाल्या. मेहबूबा यांची कन्या इल्तेजा पराभूत झाली. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या निर्णयामुळे भाजपला काश्मीर खो-यात एकही जागा जिंकता आली नाही. जम्मूमध्ये अपेक्षित यश मिळाले तरी सत्तेत येता आले नाही. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यावर प्रारंभीच्या कलानुसार हरियाणात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता, कार्यकर्त्यांनी मिठाई वाटण्यास सुरुवात केली होती.

मात्र, काही मिनिटांतच चित्र पूर्णपणे पालटले. भाजपाने मुसंडी मारल्याचे दिसले आणि दुपारपर्यंत सत्तास्थापनेसाठीचा ४६ हा बहुमताचा जादुई आकडा पार करत तिस-यांदा एकहाती सत्ता मिळवण्याची हॅट्ट्रिक साधली. सैन्य भरतीची अग्निवीर योजना लागू करण्याला झालेला तीव्र विरोध, दिल्लीतील जंतरमंतरवर झालेले कुस्तीपटूंचे आंदोलन आणि सुमारे दीड वर्ष चाललेले शेतकरी आंदोलन यामुळे हरियाणात भाजपविरोधी वातावरण तयार झाले होते. त्याचा भाजपला जोरदार फटका बसेल असे म्हटले जात होते. याचा अंदाज आल्याने भाजपाने हरियाणात नेतृत्व बदल केला. मनोहरलाल खट्टर यांच्याऐवजी नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. हरियाणात शेतकरी आंदोलनामुळे जाट मतदारांच्या नाराजीचा फटका बसणार हे लक्षात आल्याने नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदी बसवून ओबीसी कार्ड खेळण्याची चाल भाजपला यशदायी ठरली. ओबीसी आणि सवर्ण समाजाचा प्रभाव असलेल्या कर्नाल, फरिदाबाद, गुडगाव, भिवानी-महेंद्रगढ आणि कुरुक्षेत्र मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले. प्रचारात ब्रँड मोदींचाही फायदा भाजपला झाला. मोदी-शहा जोडीने हरियाणात १४ जाहीर सभा घेतल्या. मागासवर्गीय समाजाची क्रिमिलेयरची मर्यादा सहा लाखांवरून आठ लाखांवर नेली. राज्य शासनातील इतर मागासवर्गीयांचे गट ‘अ’ आणि गट ‘ब’ साठीचे आरक्षण १५ टक्क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत वाढवले.

असे काही निर्णय भाजपसाठी फायद्याचे ठरले. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवली होती. राहुल गांधी यांनी डझनभर सभा घेत विजय संकल्प यात्रा काढली होती. परंतु काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कुमारी सेलजा तिकिट वाटपावरून नाराज होत्या. त्यांनी स्वत:ला प्रचारापासून दूर ठेवले होते. म्हणजे प्रमुख नेत्यांमधील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला. भाजपने विजयाचा गुलाल उधळला असला तरी संजय सिंह, कंवरपाल गुर्जर, डॉ. कमाल गुप्ता, रणजित चौटाला, सुभाष सुधा हे मंत्री पराभूत झाले आहेत. हरियाणातील निकालाचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले आहे. विकासाचे राजकारण आणि उत्तम प्रशासन याचा हा विजय आहे. जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पक्ष कोणतीही कसूर ठेवणार नाही असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील विजयाबद्दल मोदी यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अभिनंदन केले. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान केले यावरून जनतेचा लोकशाहीवर विश्वास असल्याचे सिद्ध झाले असे ते म्हणाले.

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेसने अमान्य केला असून त्यामागे कारस्थान असल्याचा आरोप केला आणि लोकशाही प्रक्रियेच्या उपकरणांच्या सत्यतेबाबतचे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. हरियाणा निवडणुकीचे निकाल हा पारदर्शकता आणि लोकशाही प्रक्रियेचा पराभव आहे, असा आरोप पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी केला आहे. मतमोजणी प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत १४ मतदारसंघांत त्रुटी होत्या असे ते म्हणाले. हरियाणातील एकही घटक भाजपला अनुकूल नव्हता असे चित्र असतानाही भाजपने तिथे बाजी मारली. जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत मात्र भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीर वेगाने विकसित होत असल्याचा भाजपचा दावा फोल ठरला. त्यामुळे हरियाणात भाजपचा जय-जय झाला असला तरी जम्मू-काश्मीरमध्ये त्यांचा पराजय झाला असेच म्हणावे लागेल. या दोन्ही राज्यांच्या निकालावर काँग्रेस पक्षाचे भवितव्य आणि पुढील वाटचाल अवलंबून होती. दोन्ही ठिकाणी काँग्रेसला संमिश्र यश मिळाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR