20 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमुख्य बातम्या‘जय भीम’च्या घोषणांनी संसद दणाणली!

‘जय भीम’च्या घोषणांनी संसद दणाणली!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनात विरोधकांकडून ‘जयभीम’च्या घोषणा देण्यात आल्याने बुधवारी संसद दणाणली. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले.

अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ झाला. दरम्यान, आज लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांकडून ‘जय भीम’च्या घोषणा देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर विरोधकांनी अमित शाहांविरोधात आंदोलनही केले. आधी संसदेच्या बाहेर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी ‘अमित शाह माफी मांगो’च्या घोषणा दिल्या.

अमित शाह यांनी आंबेडकरांविषयी केलेल्या वक्तव्या विरोधात काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. यामध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही सहभागी झाले होते. दरम्यान, आज संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी संसदेच्या बाहेर हातात डॉ. आंबेडकरांचे फोटो घेऊन जोरदार निदर्शने करत अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे अशी एकच मागणी लावून धरली. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अमित शाह माफी मांगो आणि जयभीमच्या घोषणा देत सभागृह हादरून सोडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR