लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी लातूर येथे आयोजित जय शिवाजी, जय भारत पदयात्रेची वेळ आणि मार्गात बदल करण्यात आला आहे. आता ही पदयात्रा दयानंद सभागृह येथून १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता सुरु होणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे. तसेच या पदयात्रेत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वीच्या नियोजनानुसार १९ फेब्रुवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथून ‘जय शिवाजी, जय भारत पदयात्रा’ सुरु होणार होती. मात्र, आता या मार्गात आणि वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दयानंद सभागृह येथून १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता येथून पदयात्रेला सुरुवात होईल. तसेच पदयात्रेमध्ये ढोल पथक, विविध पारंपारिक वेशभूषा केलेले विद्यार्थी, नागरिक, चित्ररथ सहभागी होणार आहे. तसेच मोटार सायकल रॅलीचाही यामध्ये समावेश असणार आहे.
दयानंद सभागृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुन्हा दयानंद सभागृह असा पदयात्रेचा मार्ग राहील. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित पोवाडा सादरीकरण होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.