बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये भाषण करताना अचानक प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीडमध्ये आज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून हजेरी लावली. या मेळाव्यात भाषण करत असताना त्यांना अचानक चक्कर येऊ लागली.
जरांगे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी मंचावर खाली बसून भाषण केले. पण त्यांना जास्त त्रास होत असल्याने तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मनोज जरांगे यांच्यावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मनोज जरांगे यांना प्रकृती बिघडल्यामुळे भाषण देखील व्यवस्थित करता येत नव्हते. तरीही त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. हा मेळावा उरकून आयोजकांनी मनोज जरांगे यांना तातडीने बीडमधील रुग्णालयात दाखल केलं. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या व्हिडीओत जरांगे यांना उभं देखील राहता येत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.