नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप
पुणे : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैपासून उपोषण सुरु केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट पुणे न्यायालयाने काढले आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहका-यांनी एका नाटकाच्या प्रयोगांचे आयोजन केले होते. त्यासंदर्भात नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी संबंधित नाट्य निर्मात्याने कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पुणे न्यायालयाने नाट्य निर्मात्याच्या फसवणुकीचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने अटकेचे वॉरंट काढले आहे.
नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यानंतर मनोज जरांगे एकदा न्यायालयासमोर हजर राहिले होते.