23.7 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeधाराशिवजरांगे पाटलांचा फोन अन् जिल्हाधिका-यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे

जरांगे पाटलांचा फोन अन् जिल्हाधिका-यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे

धाराशिव : प्रतिनिधी
येथील जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या मराठा आंदोलकांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणे झाल्यानंतर व जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर शांत झाले. त्यांनी कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेत इमारतीच्या खाली अतरले. यानंतर पोलीसांनी व जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

मराठा योद्धा मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनास बसले असून बुधवारी (दि.१२) त्यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र राज्य सरकारकडून दखल घेण्यात येत नाही, याच्या निषेधार्थ धाराशिव येथील मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. त्यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी, तहसील या दोन कार्यालयाच्या इमारतीवर चढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तसेच सरकारने सगे-सोयरे अधिसुचना काढावी, मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तात्काळ निर्णय घेवून पत्र द्यावे, अन्यथा इमारतीवरून खाली उड्या टाकून आत्महत्या करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाची व पोलिसांची एकच तारांबळ उडाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

मराठा आंदोलक अमोल जाधव (रा. कारी), अक्षय नाईकवाडी (रा. कौडगाव), अभिजीत सुर्यवंशी (रा. सांजा), तेजस बोबडे (तुळजापूर), प्रकाश पाटील (भानसगाव), हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर तर मनोज जाधव (रा. मेडसिंगा) हे तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढले होते. मुंबई (वाशी) येथे ठरल्याप्रमाणे सगळेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकावरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलक आक्रमक होवून जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले होते. बुधवारी सायंकाळी पाच पर्यंत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास उड्या मारून आत्महत्या करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयावर चढल्यानंतर या आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे प्रशासनातील अधिकारी खडबडून जागे झाले असून स्वत: जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह इतर अधिका-यांनी त्यांना खाली उतरण्यासाठी विनंती केली. परंतू ते खाली उतरत नव्हते. त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयास पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलनकर्त्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची डेडलाईन दिली होती.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलकांशी मोबाईल वरून बोलणे झाले. त्यांनी गुरूवारी (दि. १३) जून रोजी अंतरवली-सराटी येथे आंदोलकांना ूबैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी आंदोलकांच्या मागण्या सरकारकडे कळविण्याचे आश्वासन देऊन यशस्वी मध्यस्थी केली. त्यानंतर आंदोलक इमारतीच्या खाली उतरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR