24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमुख्य बातम्याजर्मनीचा नागरिक बनला भारतात ४ वेळा आमदार!

जर्मनीचा नागरिक बनला भारतात ४ वेळा आमदार!

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोणताही नागरिक त्या-त्या राज्यात विधानसभेची निवडणूक लढवू शकतो, किंवा देशाच्या कोणत्याही भागातून लोकसभेची निवडणूक लढवू शकतो. पण एखादा दुस-याच देशाचा नागरिक आला आणि भारतात आमदार झाला तर? होय, असाच एक प्रसंग तेलंगणामध्ये घडला असून जर्मनीचा नागरिक असलेल्या व्यक्तीने तेलंगणामध्ये तब्बल चार वेळा आमदारकी भोगली आहे. चेन्नामनेनी रमेश असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याचे जर्मन नागरिकत्व उघडकीस आल्यानंतर त्याला उच्च न्यायालयाने ३० लाखांचा दंड ठोठावला आहे.

चेन्नामनेनी रमेश हे तेलंगणातील चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पार्टीचे आमदार होते. रमेश हे सर्वप्रथम २००९ साली वेमुलवाडा मतदारसंघातून टीडीपीच्या तिकिटावर आमदार झाले. त्यानंतर २०१० ते २०१८ या दरम्यान बीआरएसच्या तिकिटावर तीन वेळा निवडणूक लढवली आणि आमदार झाले.

तेलंगणा उच्च न्यायालयाने सोमवारी (०९ डिसेंबर) काँग्रेस नेते आदी श्रीनिवास यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल दिला. उच्च न्यायालयाने म्हटलंय की, बीआरएसचे माजी आमदार चेन्नामनेनी रमेश हे जर्मन नागरिक आहेत आणि त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून, वेमुलवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी स्वत:ला भारतीय नागरिक म्हणून सादर केले. या काळात ते जर्मन नागरिक नव्हते याबाबतची कोणतीही कागदपत्रे सादर करण्यास ते अयशस्वी ठरले.

न्यायालयाने चेन्नामनेनी रमेश यांना ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या रकमेपैकी २५ लाख रुपये हे काँग्रेस नेते आणि याचिकाकर्ते श्रीनिवास यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात चेन्नामनेनी रमेश नोव्हेंबर २०२३ च्या निवडणुकीत हरले होते.

न्यायालयाच्या निकालानंतर काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, रमेश याआधी वेमुलवाडा मतदारसंघातून चार वेळा विजयी झाले होते. २००९ मध्ये तेलुगु देसम पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले. नंतर पुन्हा २०१० ते २०१८ या दरम्यान ते तीन वेळा आमदार झाले. आपल्या देशातील कायद्यानुसार, भारताचा नागरिक नसलेला व्यक्ती या देशातील कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही किंवा मतदान करू शकत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR