पालघर : प्रतिनिधी
पालघरमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दोन विद्यार्थिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. डहाणू तालुक्यातील सुखडआंबा गावात जलजीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या टाकीच्या कठड्याचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींना जीव गमवावा लागला आहे. तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.
मृतांमध्ये हर्षदा रघू पागी (वय ११) आणि संजना प्रकाश राव (वय १२) यांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत रीना रशू फरारा ही गंभीर जखमी झाली आहे. सुखडआंबा गावातील जिल्हा परिषद शाळा सुटल्यानंतर शाळेच्या जवळच असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीवर या विद्यार्थिनी खेळण्यासाठी चढल्या होत्या.
मात्र टाकीच्या निकृष्ट बांधकामामुळे कठड्याचा स्लॅब कोसळला आणि या तीनही विद्यार्थिनी टाकीवरून खाली कोसळल्या. यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक विद्यार्थिनी मध्ये अडकल्याने ती गंभीर जखमी आहे.