लातूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यात सुरू झालेल्या अमृतधारा अभियानांतर्गत जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ आज लातूर तालुक्यातील मळवटी येथे उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी तहसीलदार सौदागर तांदळे, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, सरपंच गोविंद गरड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजकुमार पाटील, कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाचे कर्मचारी, महिला बचत गटाच्या सदस्या आणि शेतकरी उपस्थित होते.
मळवटी येथील शेतकरी किशोर पाटील यांच्या शेतात लोकसहभागातून जलतारा प्रकल्पांतर्गत तीन खड्डे खणून त्यात दगड भरण्यात आले. उपविभागीय अधिकारी श्रीमती न-हे-विरोळे यांनी शेतक-यांना जलतारा प्रकल्पाचे महत्त्व, त्यामुळे होणारे फायदे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) हा प्रकल्प कसा राबवता येईल, याची माहिती दिली. त्यांनी गावातील सर्व शेतक-यांना या योजनेचा लाभ घेऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शेतक-यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत गावात जास्तीत जास्त जलतारा खड्डे खणण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पर्यवेक्षक ओम चिंताले आणि कृषी सहाय्यक विशाल झांबरे यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन सचिन पंडगे यांनी केले.