जळकोट : प्रतिनिधी
नांदेड ते तोगरी या राष्ट्रीय महामार्गाची तीन-चार वर्षांमध्येच प्रचंड अशी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रोडला मोठ्या भेगा पडल्या आहेत तर अनेक ठिकाणी रोड दबू लागला आहे , राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर जळकोट ते पाटोदा बुद्रुक दरम्यान सिमेंट रोडला मोठ्या भेगा पडल्या आहेत.या भेगांमध्ये दुचाकीचे टायर अडकून बसत आहे. यामुळे अनेक मोटर सायकल स्वार पडून जखमी झालेले होते. दैनिक एकमतने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर दुस-याच दिवशी रस्त्याची थातूर-माथूर दुरुस्ती करण्यात आली आहे.
नांदेड ते तोगरी या राष्ट्रीय महामार्गामुळे जळकोट अविकसित तालुका विकासाच्या वाटेवर येणार आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासही सुरुवात झाली, जवळपास तिरुका आणि मानसपुरी ही दोन ठिकाणे सोडली तर बाकी सर्वच ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग टिकाऊ असेल असे नागरिकांना वाटत होते परंतु वर्षभरातच सिमेंटच्या रस्त्याला भेगा पडू लागल्या. तसेच अनेक ठिकाणी तो दबू लागला. संबंधित अधिका-यांनी सिमेंट रस्ता उकडून त्या ठिकाणी नवीन रस्ता केला गेला मात्र जळकोट ते पाटोदा बुद्रुक दरम्यान गत अनेक महिन्यापासून रोडवर मोठ भेगा पडल्या. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांंचे दुर्लक्ष होत होते.
यानंतर एकमतने ही समस्या बातमीच्या माध्यमातून मांडली . यानंतर संबधित विभागाच्या वतीने या भेगांवर डांबराचा लेप लावण्यात आला. यामुळे थोडाफार अपघात होण्यापासून सुरक्षा मिळाली असली तरी त्याच्या बाजूस रस्ता दबला आहे पंरतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे . या दबलेल्या रस्यावरून वेगाने गाडी चालवणे अवघड जात आहे. या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे .दबलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.