जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील शेतक-यांची पाठ निसर्ग काही सोडताना दिसून येत नाही . एकीकडे सरकारची शेतक-यांना साथ नाही आणि दुसरीकडे निसर्गही शेतक-याची परीक्षा आता घेताना दिसून येत आहे . यावर्षी अतिवृष्टीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतक-यांना अशा होती ती तुर या पिकाची परंतु जळकोट तालुक्यात गत चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीचे पीक संकटात सापडले आहे .
जळकोट तालुक्यांमध्ये जवळपास ५००० हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड केली आहे . याच तुरीवर शेतक-यांची पूर्ण वर्षभराची मदार आहे. यावर्षी सोयाबीन तसेच कापूस व मूग व उडीद या पिकांचे अति पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये प्रचंड अशी घसरण झालेली आहे सोबतच कापूस पिकावर देखील लाल्या रोगाची लागण झालेली आहे यामुळे कापसाचे देखील प्रचंड नुकसान होत आहे अशातच कापसाचे भाव देखील सात हजाराच्या आसपासच आहेत .
तुरीला ब-यापैकी भाव आहे यामुळे खरीप हंगामामध्ये ज्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे नुकसान भरपाई दूर या पिकातून होईल अशी अपेक्षा शेतक-यांंना होती. अनेक शेतक-यांनी तुरीवर फवारणी देखील केलेली आहे. यामुळे तुरीला मोठ्या प्रमाणात फुलांची उगवण झाली होती . शिवार पिवळे दिसत होते . परंतु जळकोट तालुक्यामध्ये चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण आहे . पूर्णपणे थंडी गायब झालेली आहे वातावरणामध्ये उकाडा वाढलेला आहे. या ढगाळ वातावरणामुळे शिवारांमधील तुरीच्या फुलाची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे . यामुळे वातावरणातील बदलाचा तुरीला फटका बसू लागला आहे.