जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये पावसाने केवळ २६ मे रोजी या एकाच दिवशी विश्रांती घेतली होती . यानंतर पुन्हा २७ मे रोजी दुपारी पावणे तीन ते पावणे चार दरम्यान एक तासभर जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे पुन्हा एकदा शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते .
या सततच्या पावसामुळे आता शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलेला आहे . शेतशिवारातील कामे तशीच ठप्प आहेत . अनेक शेतक-यांचे भुईमूग काढणे तसेच कांदा काढणे यासोबतच ज्वारी काढणे सुरू आहे . ऐन काढणीच्या हंगामात पाऊस पडत आहे यामुळे शेतक-यांचे प्रचंड हाल होत आहेत. कधी नव्हे ते मे महिन्यात एवढा मोठा पाऊस झाला आहे . शेतकरी तसेच इतर नागरिकांनीही असा पाऊस पडेल याची कल्पनाही केली नव्हती. ११ मे पासून पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू आहे दि १८ मे पासून मात्र पावसाचा जोर वाढला आहे. दि २५ व २६ मे रोजी पावसाचा जोर कमी होता मात्र पुन्हा एकदा दि २७ मे रोजी दुपारच्या सुमारास वा-यासह एक तासभर जोरदार पाऊस कोसळला .
पावसाने दि २६ मे रोजी विश्रांती दिल्यामुळे शेतक-यांनी दि २७ रोजी सकाळच्या सुमारास शेतामध्ये आंतरमशागतीची कामे सुरू केली होती . तुराटी वेचने , कापसाच्या पराठ्या उपटणे , वखरणी करणे, अशी कामे सुरू केली होती, तसेच यासोबत ज्या शेतक-यांनी ज्वारी खुडून झाकून ठेवलेली आहे. असे शेतकरी राशीही करीत होते मात्र अचानक आलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा ही कामे खोळंबली आहेत. आता शेतकरीही निसर्गाच्या चक्रापुढे हातबल झाले आहेत . आता जे होईल ते बघू अशी प्रतिक्रिया शेतक-यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे . शेतीची अंतर मशागत नाही झाल्यास पेरणी करूनही उपयोग होणार नाही असेही शेतकरी सांगत आहेत . पावसामुळे शेतक-यांच्या ज्वारीला वरच्यावर कोंब फुटत आहेत तर भूईमुगा शेंगालाही कोंब फुटत आहेत.