21.1 C
Latur
Saturday, September 27, 2025
Homeलातूरजळकोट तालुक्याला रात्रभर पावसाने झोडपले 

जळकोट तालुक्याला रात्रभर पावसाने झोडपले 

जळकोट : ओमकार सोनटक्के
जळकोट तालुक्यामध्ये दि. २६ सप्टेंबरच्या रात्री २७ सप्टेंबर च्या रोजी सकाळ पर्यंत मुसळधार पाऊस पडला. जळकोट मंडळामध्ये या वेळेत तब्बल ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जळकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
जळकोट तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला. तसेच तिरुका गावाजवळून वाहणा-या तिरू नदीला तिस-यांदा महापूर आलेला आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये पुन्हा पाणी शिरले असून उरलेसुरले पीके वाहून गेलेी आहेत. यासोबतच तिरू नदीवर असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे भगदाड पडल्याने जळकोट ते उदगीर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्वत: तहसीलदार राजेश लांडगे तसेच पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण या ठिकाणी उपस्थित होते.
जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी गावाला जोडणा-या दोन्ही बाजूकडील पुलावरून पाणी जात असल्यामुळे या गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे. या गावातील नागरिकांना पाच ते सहा तासापासून गावाबाहेर पडणे अवघड होऊन बसले होते. यासोबतच पाटोदा खुर्द ते माळहिप्परगा या मार्गावरील वाहतूक देखील बंद झाली आहे. चिंचोली ते मेवापूर या मार्गावर असलेल्या पुलावरून पाणी जात असून यामुळे हा मार्ग देखील बंद करण्यात आला आहे.
पाखंडेवाडी ते वाडी पाटी दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे सहा तासापासून या ठिकाणची देखील वाहतूक ठप्प आहे. बेळसांगवी ते कोळनुर दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असून यामुळे या ठिकाणची वाहतूक देखील ठप्प झाली आहे. बेळसांगवी या गावाला सध्या पुराने वेढा दिलेला आहे. या ठिकाणची दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे नागरिकांच्या घरा समोरून कमरे एवढे पाणी वाहत होते. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले तर डोंगर कोनाळी येथील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
तिरु नदीला आलेल्या महापुरामुळे सातही उच्च पातळी बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. तसेच प्रचंड पूर असल्यामुळे डोंगरगाव गावाजवळ तसेच सुल्हाळी गावाजवळ शेतामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यासोबतच अतनूर येथे देखील महापूर आलेला आहे. अतनुरच्या बसस्थानकाजवळ पाणी जाऊन पोहोचले आहे . यामुळे या ठिकाणच्या नागरिकांच्या संकटांमध्ये वाढ झाली आहे . यासोबतच परिसरातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR