जळकोट : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते जळकोट ते वांजरवाडा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. यानंतर या रस्त्याचे कामही सुरू झाले होते परंतु आता या रस्त्याचे काम रखडले असून या महत्वपूर्ण रस्त्यावर पडल्यामुळे वाहनधारक तसेच सामान्य नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे . जळकोट ते वांजरवाडा हा रस्ता जळकोट शहरातील नागरिकांसाठी अस्मितेचा विषय आहे. १९९९ यावर्षी जळकोट शहरातील नागरिकांनी जळकोट ते वांजरवाडा हा रस्ता श्रमदानातून तयार केला होता. हा रस्ता पूर्वी पानंद रस्ता होता परंतु जळकोट शहरातील हजारो नागरिक एकत्र येत हा रस्ता दोन दिवसांमध्ये पूर्ण केला.
कालांतराने या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा रस्ता अरुंद राहिला आहे. यानंतर जळकोटकरांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने जळकोट कुणकी रोडवरील मारुती मंदिर ते वांजरवाडा या रस्त्यावर डांबरीकरणासाठी निधी मंजूर केला व डांबरीकरण झाले मात्र या रस्त्यावरून वाहतूक वाढल्यामुळे डांबरीकरणही उकडून गेल्यानंतर मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. प्रशासनाने या रस्त्यावर एकदाच संपूर्ण डांबरीकरण केले नाही. तुकडे पाडत डांबरीकरण केले यामुळे दरवर्षी काही भाग चांगला तर काही भाग उघडलेला अशीच परिस्थिती असायची.
यानंतर राज्याचे तत्कालीन क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे यांनी जळकोट ते वांजरवाडा या रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. उन्हाळ्यामध्ये या रस्त्याचे कामही सुरू झाले मात्र गिट्टी टाकल्यानंतर झाल्यानंतर रस्त्यावर हॉटमिक डांबरीकरण झाले नाही यामुळे आता गिट्टी उघडी पडली आहे. यामुळे या रस्त्यावरून शेताकडे जाणा-या शेतक-यांनाही त्रास होत आहे तसेच वाहनधारकांनाही प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे . या गिट्टीवरून वाहन घसरून पडल्यामुळे अनेक वाहनधारकही जखमी झाले आहेत.