जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये दिनांक ११ मे पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, दररोज थोडा का होईना पाऊस पडून जात आहे. मधले १८ मे ते २३ मे पर्यंत तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यातल्या त्यात जळकोट मंडळामध्ये अधिकचा पाऊस झाला. जळकोट मंडळामध्ये पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला असून केवळ १४ दिवसांमध्ये आणि विशेषता मे महिन्यात दोनशे मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झालेली आहे. तर २४ मे रोजी देखील जळकोट तालुक्यामध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली होती.
या सततच्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढलेली असून अनेकांच्या विहीर तसेच बोरला देखील पाणी वाढलेले आहे. यासोबत छोटे-मोठे कालवे तसेच नदी-नाले वाहते झालेले आहेत. यामुळे मे महिन्यात तालुक्यात जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी झाले असून या अवकाळी पावसामुळे पाणीटंचाई दूर झाली आहे. मात्र या सततच्या पावसामुळे शिवारातील कामे ठप्प झाली आहेत. शेतक-यांच्या उन्हाळी ज्वारीचे तसेच कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांगर टी, वखरणी, धसकट वेचणे, तुरटी वेचणे आदी महत्त्वाची कामे राहिलेली आहेत. या पावसामुळे शेतक-यांची चिंता वाढलेली आहे.
जळकोट मंडळा बरोबरच घोणशी मंडळामध्ये देखील पाऊस झालेला आहे, या झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे अनेक साठवण तलावांमधील पाणी पातळी वाढलेली आहे. आता मात्र पाऊस बस म्हणण्याची वेळ आलेली आहे. हे देवा आता पाऊस थांबव आम्हाला मशागतीचे कामे करायचे आहेत असे शेतकरी साकडे घालत आहेत.