जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुका होऊन २३ वर्ष झाले तरी या तालुक्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत राहिलेले आहे, जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात साठवण तलाव झाले आहेत. त्यामुळे जळकोटला स्वतंत्र जलसिंचन कार्यालय सुरू होणे गरजेचे असताना अधिका-यांनी मात्र याकडे लक्ष दिले नाही. वेळीच जर ही कार्यालये सुरू झाले असते तर याचा फायदा हजारो शेतक-यांना झाला असता, जलसिंचन कार्यालय शेतक-यांसाठी अतिशय महत्त्वाचे असून हे कार्यालय जळकोट या तालुक्याच्या ठिकाणी सुरू करावे अशी मागणी तालुक्यातील शेतक-यांची आहे.
जळकोट तालुक्यात हावरगा, ढोरसांगवी हे मध्यम प्रकल्प आहेत तर चेरा, केकतसिंदगी ,चाटेवाडी, हळदवाढवणा, डोंगरगाव, कोनाळी, धोंडवाडी, गुती, करंजी ,सोनवळा ,रावणकोळा, माळहप्पिरगा ,जंगमवाडी, याठिकाणी १५ च्यावर साठवण तलावे झालेली आहेत, तसेच अनेक साठवण तलावे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. जळकोट तालुक्यातील तिरू नदीवर बॅरेजेस झालेली आहेत. या ठिकाणी शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात मोटारी बसविण्याची तयारी सुरू केली आहे . शासनाच्या निकषाप्रमाणे जर एखाद्या तालुक्यात दहा साठवन तलाव असतील तर या साठवण तलावाच्या देखरेखीसाठी एक जलसिंचन कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी सुरू होणे गरजेचे आहे परंतु जळकोट तालुक्यात १५ च्या वर साठवण तलावे झाली आहेत . यासोबतच सात उच्च पातळी बंधारे झाले आहे.
असे असले तरी जळकोट याठिकाणी जलसिंचन विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आलेले नाही. जळकोट तालुक्यातील शेतक-यांना साठवण तलावाच्या कुठल्याही कामासाठी तालुका सोडून जुन्या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. जळकोट येथे जलसिंचन विभागाचे शाखा कार्यालय सुरू झाले तर पाणीपट्टी भरणे ,तलावावर मोटारी बसविण्यासाठी परवानगी घेणे तसेच इतर अनेक कामे होऊ शकतात त्यामुळे याचा फायदा शेतक-यांना होऊ शकतो. यामुळे जळकोट येथे तात्काळ जलसिंचन कार्यालय सुरू करण्याची गरज आहे. मात्र याकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे याचा फटका शेतक-यांना सहन करावा लागत आहे .