लातूर : प्रतिनिधी
जळकोट : प्रतिनिधी उदगीर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावर जांब बुद्रुक गावाजवळ मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून या कच-यामुळे या परिसरात उग्र वास येत असून यामुळे अनेक नागरिक हे आजारी पडत आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिका-यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य नागरिकाकडून केली जात आहे .
जांब- जळकोट रोड येथे कच-याचे साम्राज्य पसरले आहे. गावात येणा-या प्रत्येक व्यक्तीला रस्त्यांवरील घाण आणि कच-याचे दर्शन होते, आरोग्याच्या दृष्टीनेही धोका निर्माण झाला आहे. कच-यामुळे मच्छर आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून, रोगराई पसरण्याची भीती आहे. विशेष म्हणजे जांब ग्रामपंचायत अंतर्गत असणा-या विविध हॉटेलमधून तसेच इतर व्यवस्थापनामधून हा कचरा जळकोट रोडवर बिनधास्तपणे अगदी महामार्गावर टाकला जात आहे. याकडे ग्रामपंचायतीचेही दुर्लक्ष होत आहे. कच-यामुळे लहान मुले आणि वृद्ध यांना अधिक त्रास होत आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून नांदेड येथील गुरुद्वारासाठी तसेच बिदर येथील गुरुद्वारासाठी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर जात असतात.