अहिल्यानगर : प्रतिनिधी
शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे, अशी बोचरी टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. शरद पवार यांनी लोकांचे वाटोळे केले.
त्यांनी आता जनता आणि राज्याचे आणखी वाटोळे करू नये, असेही विखे-पाटील यांनी म्हटले. मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे-पाटील गुरुवारपासून मतदारसंघात सक्रिय झाले. त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली.
यावेळी त्यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करणा-या विरोधकांनाही फटकारले. लोकसभा निवडणुकीत मविआला घवघवीत यश मिळाले, महायुतीची पीछेहाट झाली होती. त्यावेळी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त का केली नाही? ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देऊन टाकायला हवा होता. निवडणूक नाकारायला हवी होती. जनमत बाजूने असले की ईव्हीएम चांगले आणि विरोधात गेले की ईव्हीएम वाईट, असे विरोधकांचे धोरण असल्याचे विखे-पाटील यांनी म्हटले.
माझ्यावर ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशीर्वाद आहे. मला दिलेल्या संधीत मी चांगले काम करून दाखवले आहे. तो विश्वास पुन्हा पक्षनेतृत्व व्यक्त करेल, अशी अपेक्षा विखे-पाटील यांनी व्यक्त केली.