बारामती : प्रतिनिधी
प्रत्येक जण आपल्या जातीचा किंवा धर्माचा झेंडा घेऊन बसला आहे. त्यांनी नंगानाच केला, तरी त्यांना चालते. कारण त्यांच्या हाती जातीचे धर्माचे ‘झेंडे’’ आहेत पण सामान्य जनतेने प्रश्न विचारले, तर त्यांच्यावर खटले दाखल होतात. कायद्याचा धाक दाखवला जातो आणि दडपशाही केली जाते, असा आरोप प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर केला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील निरा येथे दिव्यांग बांधवांच्या वतीने बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर, सत्ताधा-यांवर आणि सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीवर परखड आणि स्फोटक भाष्य केले आहे.
सचिन तेंडुलकरनं केलेल्या ऑनलाईन गेम ऍपच्या जाहिरातीवरूनही बच्चू कडू यांनी टीकेची झोड उठवली. सचिन तेंडुलकर यांनी ‘रमी’ची जाहिरात केली आणि त्याचे बळी राज्याचे कृषिमंत्री ठरले. मोबाईलवर पत्ते खेळले तर चालते, पण ऑफलाईन खेळले तर पोलिस पकडतात. कायदा असाच एकतर्फी असेल का? असा खोचक सवाल त्यांनी केला.
आता गुंडगिरी वाढली
पूर्वी राजकारणी कामातून उत्तर द्यायचे, आज गुंडागर्दीतून देतात. आता तर राजकारणात गुंडगिरीचा वापर सर्रास सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुंडांची सत्ता निर्माण झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आका आहे आणि त्या आकाचादेखील आका आहे. कोणाला कसे संपवायचे, याचेच राजकीय डावपेच सुरू आहेत. लोकांमध्ये एवढी गुलामगिरी रुजवली गेली आहे की, बाप मेला तरी चालेल, पण नेता जिवंत पाहिजे, हीच मानसिकता ठेवली जाते.