पाथरी : तालुक्यातील मुदगल येथील उच्चपातळी बंधारा पुर्णत: कोरडा पडला आहे. सोनपेठ शहरासह अनेक गावांची तहान भागवना-या मुदगल येथील उच्चपाळी बंधा-यात बी ५९ चारीव्दारे जायकवाडीचे पाणी सोडण्याची मागणी वाघाळा ग्रमपंचायतने ग्रामसभेच्या ठरावाव्दारे सरपंच बंटी पाटील यांनी पाथरीच्या उपविभागीय अधिकारी आणि जायकवाडी पाटबंधारे उपविभागीय अभियंत्याकडे दि.३ एप्रिल रोजी केली आहे.
गत खरीप हंगामात पाथरी आणि बाभळगाव मंडळात सरासरीच्या अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने भुगर्भात पाणी साठवण झाली नसल्याने नोव्हेंबर, डिसेंबर महिण्या पासुनच पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा-याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे शेतकरी आणि ग्रामस्थ सांगत आहेत. नदी, नाले, ओढ्यांना कोरड पडलेली असल्या कारणाने वन्यप्राणी आणि पाळीव प्राण्यांनाही पाण्यासाठी गाव शिवारात वनवन भटकंती करावी लागत आहे. मार्च महिण्याच्या मध्या पासुनच गावागावात पाण्याची टंचाई तिव्र होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. पाऊस कमी झाल्याने मुदगल उच्चपातळी बंधारा पुर्ण क्षमतेने भरला नव्हता.
मार्च महिण्याच्या मध्यातच मुदगल बंधारा पुर्णपणे कोरडा पडल्याने या बंधा-यावर सोनपेठ शहरासह पाथरी आणि परळी तालुक्यातील अनेक गावांची तहान भागत असल्याने या बंधा-यात बी ५९ चारीने फुलारवाडी येथून ओढ्याव्दारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडावे अशी मागणी वाघाळा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेत ठराव घेऊन करण्यात आली आहे. तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन नदी, ओढे, नाले यामध्ये बी ५९ चारीच्या कालव्यांव्दारे पाणी सोडून जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या ठरावाव्दारे करण्यात आली आहे.
पाथरी आणि बाभळगाव मंडळ शासनाच्या वतीने नोव्हेंबर महिण्यात दुष्काळी म्हणून जाहिर केलेले आहे. या भागात चा-याची तीव्र टंचाई असून चारा पिकाला या पाण्याचा फायदा होणार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने १ एप्रिल पासुन रोटेशन पद्धतीने पाणी देण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे. बी ५९ या चारीवर देवनांद्रा, बांदरवाडा, पाथरी, पुरा, तुरा, गुंज, मसला, टाकळगव्हाण, जैतापुरवाडी, कान्सूर, गौंडगाव, लोणी,बाबुलतार, बाभळगाव, सारोळा, पिंपळगाव, वाघाळा, फुलारवाडी, बनई, लिंबा, विटा, मुदगल, वझुर, कुंभारी, वांगी, रामपुरी, ढालेगाव, खेर्डा या शिवारात पाणी मिळते. या संपुर्ण गावात आता पाणी टंचाई तिव्र होत असल्याचे शेतकरी आणि ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे पाथरीच्या जायकवाडी उपविभागाने त्वरीत पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.