जालना : जालना जिल्ह्यातील अनेक गावांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत सोमवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये ज्वारी, मिरची, शेडनेट भाजीपाल्याचे चांगलेच नुकसान झाले. सायंकाळी गारपीट झाल्याने जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत धांदल उडाली. कुंभारी येथील पल्लवी विशाल दाभाडे (१९) या महिला शेतक-यासह सिपोरा बाजार येथील शिवाजी गणपत कड (३८) या दोघांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला.
जालना जिल्ह्यात ब-याच भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. यासोबतच काही वेळात ब-याच भागात जोरदार गारपीट झाली. त्यामुळे पिकांची मोठी हानी झाली. तसेच जाफराबाद तालुक्यात दोघांचा वीज पडून बळी गेला. हवामान खात्याने अगोदरच अवकाळीचा अंदाज वर्तवला होता. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळीची शक्यता वर्तवली होती. त्यात अवकाळीने तडाखा दिल्याने रबी पिकांची हानी झाली.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याला सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक गारपिटीचा तडाखा बसला आहे. या गारपिटीमुळे रब्बी हंगामामधील गहू, हरभरा, ज्वारीसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चाळीसगाव तालुक्याला रात्री आठ वाजता विजेच्या कडकडाटसह चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. पाऊस आणि गारपिटीचा जोर प्रचंड होता. त्यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहताना दिसत होते. तसेच अनेक ठिकाणी गारांचा खच पडला होता. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.