जालना : प्रतिनिधी
मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही असे म्हणत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पक्षांतराचे संकेत दिले आहेत. जालन्यामध्ये आपल्याच माणसांनी घात केल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी माझे झाले, २०२९ ला तुमचे असे होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला गोरंट्याल यांनी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांना दिला. खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल बोलत होते.
काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांनी पराभव केला. हा पराभव गोरंट्याल यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यानंतर आता गोरंट्याल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले. कैलास गोरंट्याल एकदा बोलला की बोलला. मी पाच वर्षे वाट बघणार नाही असे ते म्हणाले. जालन्यामध्ये राजकीय भूकंप होणार. एकेक भूकंप कसा कसा येईल हे सगळ्यांनाच समजेल असे संकेतही त्यांनी दिले. या भाषणानंतर गोरंट्याल यांनी आगे आगे देखो होता है क्या अशी प्रतिक्रिया दिली.
जालन्यामध्ये जास्त काम केले तर लोक जाना म्हणतात. जिथे जिथे जास्त काम केले तिथे माझ्या विरोधात फतवा निघाला. ‘मतलब के है यार मगर दिल के सब काले है. मोका मिलते ही ये डसने वाले है. किस मे कितना जहर है हमको मालूम है. सबसे ज्यादा साप हमीने पाले है’. जालन्यामध्ये अस्तिनचे साप खूप आहेत. यावेळी माझं झालं. पण २०२९ ला तुमचं होऊ नये म्हणून तुम्हाला सल्ला देतोय, असे कैलास गोरंट्याल म्हणाले.