मुंबई : महायुती सरकारने फक्त जाहिरातबाजी करण्याऐवजी राज्यातील रस्त्याकडे लक्ष द्यावे व काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेत टोलमुक्ती द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
पुणे काँग्रेस कमिटीतर्फे किणी, तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर येथील टोल नाक्यांवर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. या खड्ड्यांनी वाहनधारकांना त्रास होत आहे. अशा महामार्गावर टोल का द्यायचा, हा सवाल स्थानिक नागरिकांना पडला आहे.
राज्यात बेकायदा टोलवसुली सुरू आहे. कंत्राटदार काम करत नाहीत. त्यांचे पैसे थकले आहेत. जीव मुठीत घेऊन प्रवास करणा-यांवर टोलचा मारा मात्र होत आहे. रस्ते सुरक्षित नाहीत पण टोलवसुली मात्र सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.