नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावरील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत २१ मे रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर आता चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या वतीने कंपनीला क्लोजर नोटीस पाठवून उत्पादनाचे काम तात्पुरते थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जोपर्यंत कंपनीकडून सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना राबवून संबंधित प्रमाणपत्रे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत उत्पादन पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही. एकंदरीत यामुळे ५,००० कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पॉलिफिल्म बनवणा-या या कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरीही प्लांटमधून अजूनही धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत. आगीत कंपनीच्या प्रोडक्शन विभागातील अनेक यंत्रसामग्री, युनिट्स आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे. या कंपनीत सुमारे ५ हजार कामगार कार्यरत होते. त्यापैकी अनेक कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते. सध्याच्या स्थितीत काम बंद असल्याने बहुतांश कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांना पर्यायी रोजगाराच्या शोधात इतरत्र वळावे लागत आहे.
शासकीय कागदपत्रांनुसार, या कंपनीत सुमारे ३,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, कंपनीचा विस्तार सुमारे २६० एकर क्षेत्रावर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली असताना सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.