लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर पोलिसांनी बुधवार दि. १२ मार्च रोजी रात्री जिल्ह्यात ४० ठिकाणी नाकाबंदी केली. संशयीत वाहने, लॉज, विविध ठिकाणांची झडती घेतली. दरम्यान ३३ गुंडांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. लातूर पोलिसांकडून बुधवारी रात्री रात्रभर जागोजागी नाकाबंदी व संपूर्ण जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. रात्री ८ वाजता सुरु झालेले कोंबिंग ऑपरेशन पहाटेपर्यंत सूरु होते.
या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान जिल्ह्यात एकुण ४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. जिल्ह्यातील हॉटेलस् व लॉज यांचीही तपासणी करण्यात आली. विविध गुन्ह्यांत फरार व पाहिजे असलेल्या ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हेगरी प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी, टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. बुधवारी लातूर शहरात ठिकठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. ही मोहीम रात्रभर सुरुच होती. अनेक सराईत, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. ही कारवाई सातत्याने सुरु राहणार असल्याची माहिती यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी संपूर्ण रात्रभर जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.