लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-क व वर्ग-ड कर्मचा-यांच्या नियमित बदल्यांसाठी कार्यरत पदावरील कर्मचा-यांची सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग-क व वर्ग-ड मधील ३४७ कर्मचा-यांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केले आहेत. अनेक कर्मचारी आपल्याला सोयीचे ठिकाण मिळावे म्हणून हालचाली करताना दिसून येत आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेची तयारीही जवळपास पूर्ण झाली असून मंगळवार दि. १३ मे रोजी सकाळी १० वाजता समुपदेशनाने प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहेत.
लातूर जिल्हा परिषदेतील वर्ग-क व वर्ग-ड कर्मचा-यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यासाठी गेल्या महिणा भरापासून हालचाली सुरू आहेत. गेल्यावर्षी सदर बदल्या लोकसभा व विधान सभेच्या निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे यावर्षी अनेक कर्मचारी बदल्यांसाठी इच्छूक आहेत. तसेच अनेक कर्मचारी एकाच टेबलवर ब-याच वर्षापासून ठाण मांडून आहेत. तर कांहीजन पदोन्नती होऊनही त्याच ठिकाणी प्रभारी म्हणून काम करताना दिसून येत आहेत. जिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील संबधीत संवर्गाच्या बदल्याबाबत वास्तव्य सेवा जेष्ठता यादी अद्यावत करण्यात आली आहे. सेवा जेष्ठता यादीवर कांही आक्षेपही आले होते. त्याचे निराकारण करण्यात आले आहे.
कर्मचा-यांच्या बदल्यांसाठी सेवा जेष्ठतेला महत्व असणार आहे. कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्यासाठी १० वर्षाचा कालावधी तर विनंती बदल्यासाठी ३ वर्षाचा कालावधी ग्रा धरला जातो. त्यानुसार बदली प्रक्रीया धोरण राबवले जाणार आहे.