लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळा इमारतींची दुरावस्था झाली आहे. शाळा दुरुस्तीसाठी जनतेला किती दिवस वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन या इमारतीची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करावी, अशी मागणी विधानसभेत माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली.
महाराष्ट्र विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असुन सोमवार दि. २४ मार्च रोजी विधानसभेत बोलताना राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या एकूण किती इमारती अथवा वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत, त्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण किती निधीची आवश्यकता आहे? यावर्षात यासाठी शासनाने किती तरतूद केली आहे आणि सर्व शाळांची दुरुस्ती होण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार आहे ?, असे प्रश्नही माजी मंत्री आमदार अमितविलासराव देशमुख यांनी उपस्थित केले.
सदरील प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयरयांनी जीर्ण झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची संख्या, त्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधी व त्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात केलेली तरतूद यासंदर्भातील आकडेवारी सादर केली, राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा इमारती दुरुस्तीचा सर्वंकक्ष अराखडा तयार करण्यात येईल, अशी ग्वाहीही सभागृहात त्यांनी बोलतांना दिली.