लातूर : प्रतिनिधी
वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी प्रयत्न करत असलेल्या ‘रीड लातूर’ उपक्रमांतर्गत जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘करु या पुस्तकांशी मैत्री, जपूया वाचन संस्कृती’ हा संदेश देत जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून विविध पुस्तकांचे वाचन करण्यात आले.
लोप पावत चाललेली वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी मागील तीन वर्षापुर्वी सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख यांच्या संकल्पनेतून व धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकाराने ‘रीड लातूर’ हा उपक्रम सुरु करण्यात आला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नामांकित लेखकांचे दर्जेदार पुस्तके वाचनासाठी देवून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या कामी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभत असून समाजातील विविध घटकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
पुस्तके हे आपले मित्र असतात, पुस्तकांच्या नियमित वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडून वेगळ्या विश्वात रममाण होवून मनाला आनंद मिळतो. टी. व्ही., मोबाईलच्या काळात पुस्तकांचे महत्त्व अधीक स्पष्टपणे अधोरेखित होत आहे.
समाजात वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी प्रयत्न होत असताना जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून लातूर, रेणापूर व औसामधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी करूया पुस्तकांशी मैत्री,जपूया वाचन संस्कृती हा संदेश ‘रीड लातूर’ उपक्रमात सहभागी असलेल्या जिल्हा परिषद शाळेमधील बोर्ड वरती लिहून शिक्षकांनी विद्यार्थ्यां कडून विविध कथा, कविता, साहस कथा,आत्मचरित्र अशा स्वरूपांची पुस्तकांचे वाचन करुन घेतले, अशी माहिती ‘रीड लातूर’ उपक्रमाचे समन्वयक राजू सी पाटील यांनी दिली.