लातूर : प्रतिनिधी
मी स्वत: जिल्हा परिषद शाळेत शिकून डॉक्टर झाले आहे. जिल्हा परिषद शाळेत सर्व गुणसंपन्न असे विद्यार्थी घडवले जातात. शिक्षक वैयक्तिक लक्ष देतात. त्यामुळे सर्व पालकांनी आपली मुले जिल्हा परिषद शाळेतच घालावी असे आवाहन डॉ. सोनाली जाधव यांनी पालकांना केले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दर्जी बोरगाव येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा कटके, प्रमुख व्याख्याते डॉ. सोनाली जाधव, प्रमुख पाहुणे योग शिक्षिका ज्योती अमलापुरे, माधुरी बालकुंदे, उषाताई मोटाडे, रंजना देशमुख, योगिता कटके, माजी केंद्रीय मुख्याध्यापक भरत बिराजदार, मुख्याध्यापक परमेश्वर बालकुंदे हे होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक बालकुंदे यांंनी शाळेच्या प्रगती विषयी व गावच्या सहकार्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य वर्धित करण्यासाठीचे मार्गदर्शन केले.शाळेत निपुण महाराष्ट्र अंतर्गत उपक्रमातून विद्यार्थी १०० टक्के प्रगत करण्याचे आश्वासन पालकांना दिले. यावेळी अमलापुरे यांनी मी नियमित आपल्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना योग शिकवते, आपण याकडे दुर्लक्ष करू नका. आपण जर जागा उपलब्ध करून दिली तर मी आपणाला महिलांसाठी खास वर्ग घेते असे सांगितले व योगाचे प्रात्यक्षिक पण माता-पालकाकडून करून घेतले. करो योग रोहो निरोग हा मंत्र किती महत्त्वाचा आहे हे पटवून दिले.
अध्यक्षीय समारोपात कटके यांनी आमच्या गावाकडून सर्व प्रकारची मदत शाळेला करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे आश्वासन दिले. शाळेमध्ये असे उपक्रम झाले पाहिजेत त्यामुळे पालकांना शाळेबद्दल आपुलकी निर्माण होते असेही त्या म्हणाल्या. यावेळी सर्व महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ, वाण (पेन) देऊन कार्यक्रम संपन्न झाला. पुढे सर्व महिला पालकांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. महिला खूप आनंदाने त्यात सहभागी झाल्या. त्याचबरोबर उखाणे स्पर्धाही घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरिजाताई लोंढे यांनी केले. तर आभार प्रदर्शन काशीबाई साने यांनी केले.

