लातूर : प्रतिनिधी
आपल्या कार्यातून नावलौकिक प्राप्त केलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेती सहकारी संस्था अंतर्गत कर्जदार सभासदांना विम्याचे संरक्षण मिळावे या हेतूने जनता अपघात विमा योजना स्विकारलेली असून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकरी सभासदांना झालेला आहे.
योजनेअंतर्गत ५८६ प्राथमिक शेती सहकारी संस्थांचे २३८६२१ सभासदांचा बँकेने जनता अपघात विमा उत्तरविला असून आजपावेतो जिल्ह्यातील एकूण १३४३ मयत शेतकरी सभासदांच्या वारसांना १९ कोटी ३० लाख रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झालेली आहे. अपघाती मृत्यू झालेल्या १० सभासदांच्या वारसांना दि. ४ एप्रिल रोजी या योजनेअंतर्गत प्रत्येकी ५ लाख रुपयांप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचे धनादेशाद्वारे वितरण बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव तथा संचालक अनुप शेळके उपस्थित होते.