नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात रविवारी (दि. ५) दुपारी २ च्या सुमारास २५ वर्षीय महिलेने झाडाला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. कविता उमेश अहिवळे (रा. संत कबीरनगर, गंगापूर रोड) असे तिचे नाव आहे. तिने कौटुंबिक कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
जिल्हा रुग्णालय आवारातील आरोग्य अभियान कार्यालयालगतच्या मोकळ्या जागेतील झाडांमध्ये कविताचा मृतदेह आढळला. दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तिच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, कविताच्या मुलीला आजारपणामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार पूर्ण झाल्याने मुलीला घेण्यासाठी कविता रुग्णालयात आली होती.
मात्र दुपारच्या सुमारास तिने गळफास घेतल्याचे आढळले. ही बाब लक्षात येताच घटनास्थळी सुरक्षारक्षक, परिचारिका, डॉक्टर, पोलिसांनी धाव घेतली. सरकारवाडा पोलिस ठाणे पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.