लातूर : प्रतिनिधी
अतिवृष्टीने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयाची आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे लातूर जिल्हा दौ-यावर आले असता त्यांना संभाजी सेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या चालू वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतक-यांच्या शेतातील पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आहे. नदीकाठच्या, वड्या काटाच्या शेतक-यांनी मशागत करून तयार केलेली शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. शेतक-यांचे जनावरे सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली असून घराची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अशा या अस्मानी संकटामुळे शेतकरी आज पूर्णपणे कोडमडला आहे. त्यामुळे शेतकरी बळीराजाला आज बळ देऊन त्यांना परत एकदा उभं करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सर्व शेतक-यांना सरकारने कसलेही निकष न लावता सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत, त्याचप्रमाणे ज्या शेतक-यांची जमीन वाहून गेले आहेत,
जनावरे वाहून गेली आहेत. घराचे पडझड झाली आहे अशा शेतक-यांना हेक्टरी दीड लाख रुपयाची मदत सरकारने करणे अत्यंत गरजेचे आहे. येत्या आठ दिवसात जर शेक-यांना आर्थिक मदत मान्य नाही केली. तर संभाजी सेना मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी निवेदन देताना प्रदेश प्रवक्ते राजकुमार साळुंखे, संभाजी सेना नेते विलास लंगर, जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मदन पाटील, अमोल कांदे, प्रसाद पवार, सिद्धाजी माने, बंकटी दत्त, हनुमंत बारलेकर, संतोष शिंदे, मोहन माळी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.