लातूर : प्रतिनिधी
शालेय शिक्षण विभागाने १०० शाळांना भेट हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमदार त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. त्याचसोबत शालेय शिक्षणमंत्री व शिक्षण विभागाचे अधिकारी १०० शाळांना भेट देऊन शाळांची पाहणी करणार आहेत. छोट्या-मोठ्या शिशुवर्गातून पहिल्या इयत्तेत येणा-या लहान मुलांसाठी शालेचा पहिला दिवस काहींसा आव्हानात्मक असतो. आई-वडिलांचा हात सोडून शाळेच्या इमारतीत येताना अनेकजण रडतातही. मात्र, मुलांसाठी हा दिवस आनंददायी आणि सोहळा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने १०० शाळांना भेट या उपक्रमांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांना त्यांच्या मतदारसंघातील जवळच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची योजना आखली आहे.
दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असते. मात्र, यंदा शासनाच्या नवीन निर्णयामुळे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी शाळांवर जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. जुनमध्ये शाळा सुरु होणार असून याअनुषंगाने राज्यस्तरावर नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर सूचना करण्यात येतील. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ होणार असून शाळेविषयी मनामध्ये असलेली भिती दुर होण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिका-यांना या कार्यक्रमाचे नियोजन करावे लागणार आहे.
याबाबत शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. १०० शाळांना भेट कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावरुन सूचना येणार आहेत. सूचना प्राप्त होताच जिल्हा आणि तालुकास्तरावर नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांच्या अधिनस्थ विविध विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी, केंद्रप्रमुख, जिल्हास्तरावरील अन्य शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी जिल्ह्यातील १०० शाळांना भेट देतील.