लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील मांजरा, निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पांसह आठ मध्यम व १३४ लघु असे एकुण १४४ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा ४३३.०१९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६१.४६ टक्के पाणीसाठा आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा प्रकल्पात ७५.५३ टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात ८०.६७ टक्के पाणीसाठा आहे. आठ मध्यम प्रकल्पांत ५१.०५ टक्के तर १३४ लघू प्रकल्पांत ५१.७४ टक्के पाणीसाठा आहे.
गतवर्षी लातूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन वेळेवर झाले होते. मान्सून ब-यापैकी बसल्यानंतर पावसाने काही काळ विश्रांत घेतली होती. त्यानंतर अधुन-मधुन सातत्याने पाऊस पडत राहिला होता. पुनर्वसू नक्षत्रात अतिश्य चांगला पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प, विहिरी, नदी, नाले, पाझर तलावांचे अक्षरश: पुनर्वसनच झाले होते. सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. नद्या वाहत्या झाल्या होत्या. मांजरा, निम्न तेरणा प्रकल्पांचे दरवाजे उघडावे लाबले होते. मांजरा, रेणा नदीवरील बराजही ओव्हर फ्लो झाले होते. पावसाळा संपला, उन्हाळा सुरु झाला. उन्हाची तीव्रता वाढली. प्रकल्पांतील पाण्याचे वेगाने भाष्पीभवन होत असले तरी अद्यापही जवळपास सर्वच प्रकल्पांत ब-यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.
मांजरा प्रकल्पात १८०.७९४ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. त्यात ४७.१३० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. १३३.६६४ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ७५.५३ एवढी आहे. निम्न तेरणा प्रकल्पात १०३.५५२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्यात २९.९६७ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे तर ७३.५८५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ८०.६७ इतकी आहे. आठ मध्यम प्रकल्पांपैकी तावरजा, व्हटी, तिरु या तीन प्रकल्पांत पाणीसाठा शुन्यावर आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात ११.९२ टक्के, देवर्जन प्रकल्पात १६.२८ टक्के, साकोळ प्रकल्पात २२.५६ टक्के, घरणी प्रकल्पात १७.७० टक्के तर मसलगा प्रकल्पात ३३.२१ टक्के पाणीसाठा आहे.
मांजरा आणि निम्न तेरणा हे दोन मोठे प्रकल्प ७५ टक्क्यांपेक्षावर भरलेले आहेत. आठ मध्यम प्रकल्पांपैकी ५ ५१ ते ७५ टक्के, दोन २५ ते ५० टक्के तर एक २५ टक्क्यांच्या खाली आहे. १३५ लघु प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प ७५ टक्क्यापेक्षावर, ७७ प्रकल्प ५१ ते ७५ टक्के, ३९ प्रकल्प २५ ते ५० टक्के, १० प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहेत.