लातूर : प्रतिनिधी
खरीप हंगामात शेतक-यांना वेळेत खत उपलब्ध व्हावा कृशि दुकानदारांच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान भाव फलक नसणे, साठा रजिस्टर अद्यावत नसणे, ई-पॉस व प्रत्यक्ष खत साठ्यात तफावत असणे, दरमहा वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर न करणे अशा त्रुटी आढळून आल्याने १४ खत परवाने, एक कीटकनाशक परवाना निलंबित करण्यात आले असुन ९ विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली आहे.
वर्षा ठाकुर जिल्हाधिकारी लातूर, अशोक किरनळी, संचालक गुण नियंत्रण, कृषी आयुक्तालय पुणे यांचे आदेशानुसार, साहेबराव दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक, लातुर यांचे मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये भरारी पथक व तालुका गुण नियंत्रण निरीक्षकांमार्फत ई-पॉस मशीन व खताचा प्रत्यक्ष गोदामातील साठा याची तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.तपासणी दरम्यान प्रत्यक्ष खत साठा व ई-पॉस वरील खत साठ्यामध्ये तफावत आढळून आल्याने खत विक्रेत्यांची सुनावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कृषी विकास अधिकारी दीपक सुपेकर, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संतोष लाळगे, एम.डी.कांबळे, टिळक उपस्थित होते.