लातूर : प्रतिनिधी
भारत-पाकिस्ताना तणावाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा माजी सैनिक अधिकारी कार्यालय सतर्क झाले आहे. त्यांनी तीन वर्षांमध्ये आणि पाच वर्षांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांची यादीच तयार केली आहे. प्रशासनाकडे ही यादी माहितीसाठी सुपूर्दही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४३६ सैनिकांनी पुन्हा सीमेवर जाण्याचा निर्धार केला आहे.
लातूर जिल्ह्यातील जवळपास दोन हजारांवर जवान वेगवेगळ्या विभागांत कार्यरत आहेत. तर लातूर जिल्ह्यातील साडेतीन ते चार हजार माजी सैनिकांची संख्या आहे. यातील गेल्या पाच वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांची संख्या ही एक हजार ते बाराशे आहे. तर तीन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांची संख्या ४३६ आहे. या सर्व सैनिकांचा संपर्क क्रमांक आणि केंद्रीय सैनिक बोर्डाकडून कधीही संदेश आला तर हे सैनिक देशसेवेसाठी पुन्हा सीमेवर जाण्यासाठी तयार आहेत.
लातूर जिल्ह्यातील जवानांनी कारगिल युद्धात आपले बलिदान दिले आहे. उदगीर येथील कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी कारगिल युद्धात शहीद झाले तर रेणापुर तालुक्यातील पानगाव येथील माले, आष्टा, कोनाळी, जळकोट आदी गावांतील जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. सैन्यदलात भरती होणा-या तरुणांची लातूर जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय आणि राज्य राखीव दलात लातूर जिल्ह्यातील असंख्य तरुण भरती झाले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील पोलीस आणि रेल्वे पोलीस दलातही युवकांची संख्या आहे. सैन्य दलात भरती होण्याची क्रेझ तरुणांमध्ये आजही मोठ्याप्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: सैन्यदलात भरती होण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात असल्याचे चित्र आहे. यासाठी पहाटेपासून धावण्यासह भरतीसाठी इतर आवश्यक कसरती करण्यावर भर देत आहेत.