लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यात हळूहळू कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात सध्या या ‘जेएन-१’ व्हेरियंटचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडरसह इतर उपलब्ध साधनसामग्रीची जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली असून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन-१ चा प्रसार देशातील काही राज्यांमध्ये होत असतानाच आता जेएन-१ चा मराठवाड्यात शिरकाव झाला आहे. लातूर जिल्ह्याच्या सीमेवरील धाराशिव व बीड जिल्ह्यात जेएन-१ चे रुग्ण आढळून आल्याने या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सज्ज झाली आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण सध्या तरी जिल्ह्यात आढळून आले नाहीीत. भविष्यात असे रुग्ण आढळल्यास त्यावर उपचारासाठी आवश्यक साधनसामग्री, औषधी याचा पुरेसा साठा तालुकास्तरीय आरोग्य संस्थेतही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ऑक्सिजन सिलेंडरसह ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती तपासून आवश्यक कार्यवाही आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या अनुषंगाने प्राप्त सूचनांनुसार जिल्हास्तरावर आरोग्य यंत्रणेचा आढावा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आहे.
कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावरुन आलेल्या सूचनांनुसार कार्यवाही सुरु असून याबाबत जिल्हास्तरावरही सातत्याने आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात सध्या या व्हेरियंटचा रुग्ण आढळून आलेला नसला तरी लक्षणे असलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी कीट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या उपचारासाठी ५० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा तपासणीसाठी ‘मॉक ड्रील’ घेण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगीतले.