लातूर : प्रतिनिधी
या वर्षीच्या गणेशोत्सवाला शनिवार दि. ७ सप्टेंबरपासून उत्साहात सुरुवात झाली. अत्यंत हर्षोल्हासात गणेश भक्तांनी आपल्या लागडक्या गणरायाचे स्वागत केले. या वर्षी जिल्ह्यात १ हजार ९११ गणे मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. या मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. तर सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे ६८ मंडळांनी नोंदणी केली आहे. पावसात भिजत गणेश भक्तांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली.
गतर्षीपेक्षा या वर्षी अत्यंत चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या गणरायाचे शनिवारी घरोघरी आगमन झाले. सार्वजनिक गणेश मंडळे गेल्या एक-दोन महिन्यांपासुन गणरायाच्या स्वागातच्या तयारीत होते. मध्यरात्रीपर्यंत ढोल-ताशांचा सराव चालायचा. विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिका-यांनी शनिवारी वाजत गाजत मिरवणुका काढून गणरायाची प्रतिष्ठापना केली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपुर्वक साजरा करण्यावर भर दिला आहे. त्याशिवाय वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे, अन्नदान, आदी विषयांवरही लक्ष केंद्रीत केले आहे. गणेशोत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर विविध पोलीस ठाण्यांतर्फे ठिकठिकाणी शांतता समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त व पर्यावरणपुरक साजरा करण्याचे आवानही करण्यात आले आहे. जिल्ह्यात गणरायाच्या स्वागताच्या मिरवणुकीसाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अपर पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, ८७ सहायक पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पोलीस, एसआरपीएफ, १ हजार ५० होमगार्ड, असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.