34.3 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeलातूरजिल्ह्यात २०० हेक्टरवर होणार ‘मिलेट’ची पेरणी!

जिल्ह्यात २०० हेक्टरवर होणार ‘मिलेट’ची पेरणी!

लातूर : प्रतिनिधी
मिलेट अर्थात पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील समावेश हा आरोग्यासाठी हितकारक असून मिलेटचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात २०० हेक्टरवर मिलेट पेरणीचे नियोजन करण्यात आले असून पटेल आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते लोदगा येथून मिलेट पेरणीला सुरुवात करण्यात आली. तसेच बचत गटांच्या महिलांनी मिलेटपासून तयार केलेल्या पदार्थांचाही यावेळी त्यांनी आस्वाद घेतला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, औसा- रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भारत सूर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, डॉ. शेषेराव मोहिते यांच्यासह मिलेट पेरणी करणारे शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांना बांबूपासून बनविले पेन, टूथब्रश आणि टॉवेल देवून सत्कार करण्यात आला. लातूर, औसा आणि निलंगा तालुक्यातील शेतक-यांनी मिलेट पेरणीसाठी सहमती दर्शविली आहे.
आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आहारात तृणधान्याचा समावेश करणे आवश्यक आहे. तृणधान्यात कॅल्शिअम, लोह आणि प्रथिने याचे उच्च प्रमाण असून कमी ग्लायसेमिक इंडेक्स, मुख्य आहाराच्या तुलनेत जास्त फायबरचा समावेश आहे. तृणधान्याचे महत्व पटवून देण्यासोबतच जिल्ह्यात मिलेट लागवडीला प्रोत्साहन देण्यासोबतच उत्पादित झालेल्या मिलेटला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शेतक-यांना मिलेटचे चांगल्या प्रतीचे बियाणे लोदगा येथील फिनिक्स फौंडेशनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मिलेट पिकांसाठी कमी पाणी लागते, तसेच ८० ते ९० दिवसांत ही पिके घेतली जातात. लातूर जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा विचार करता जिल्ह्यातील शेतक-यांसाठी मिलेट लागवड फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR