जळकोट : प्रतिनिधी
येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात डाक कार्यालयाचे अखेर स्थलांतर झाले आहे. पोस्ट ऑफिस जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात होते. या पोस्ट ऑफिसमुळे शाळेला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. यामुळे पोस्ट ऑफिसचे स्थलांतर करावे, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर धुळशेट्टे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.
जळकोट येथे पूर्वी पोस्ट ऑफिस नव्हते. यानंतर जळकोट या तालुक्याच्या ठिकाणी पोस्ट ऑफिस मंजूर करण्यात आले मात्र कुठेही जागा उपलब्ध होत नसल्यामुळे जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या एका खोलीत ही जागा देण्यात आली. यानंतर जवळपास दहा वर्षांनीही पोस्ट ऑफिसने इतरत्र जागा पाहिली नाही. पोस्ट ऑफिससाठी येणा-या नागरिकांच्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. काही टवाळखोर विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्रास देत होते, दहावीची परीक्षा सुरू असताना त्रास होत होता.
जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात असलेले पोस्ट ऑफिस इतर ठिकाणी स्थलांतरित करावे, जळकोट नगरपंचायतीने दुसरीकडे या कार्यालयास जागा उपलब्ध करून देण्यासाठी सांगण्यात आले होते. हे पोस्ट ऑफिस कार्यालय इतर ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. अखेर जळकोट पोस्ट ऑफिसचे स्थलांतर जळकोट उदगीर राष्ट्रीय महामार्गावर जळकोट पोलीस ठाण्याजवळ एका खाजगी जागेमध्ये करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची गत अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. सोमवारपासून हे पोस्ट ऑफिस खाजगी जागेमध्ये कार्यान्वीत झालेले आहे.