मुंबई : मुलीच्या हळद आणि लग्नासाठी नालासोपारा, मुंबई येथून भुसावळकडे निघालेल्या आईसह चालकाचा अपघाती मृत्यू झाला असून, पाच नातलग गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव पिकअपने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही घटना सोमवारी (दि. ७) पहाटे ५.३० दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर आडगाव टी पॉईंटवर घडली.
अपघातात पिकअपचा चक्काचूर झाला आहे. ममतादेवी प्रेमकुमार मोदनवाल (वय ५४, सध्या रा. नालासोपारा, मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), जीपचालक समाधान संतोष सोनवणे (३७) अशी मृतांची नावे आहेत. श्रेया प्रेमकुमार मोदनवाल (वय १४), अभिनंदन अशोक मोदनवाल (१०), अंश अशोक मोदनवाल (१३), पिंकीदेवी अशोक मोदनवाल (४०), वरुण अशोक मोदनवाल (१६) अशी जखमी नातलगांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोदनवाल कुटुंबातील निधीने प्रेमविवाह केला असून, भुसावळ येथे सोमवारी (दि. ७) तिचा पुन्हा रीतीरिवाजाप्रमाणे विवाह होणार होता. तिच्या हळदीचा कार्यक्रम व विवाहासाठी तिचे नातलग सोमवारी (दि. ६) पहाटे २ वाजेदरम्यान नालासोपारा येथून जीप (एम.एच४८ डीसी २४६१)मधून भुसावळच्या दिशेने निघाले. जीप मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव टी-पॉईंटजवळ आली असता चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले. जीपने मालट्रकला (एमएच११ एएल ७८७९) पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात जीपचालक समाधान व ममतादेवी मोदनवाल यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.