नागपूर : जीबी सिंड्रोम आजाराने नागपुरात एक बळी घेतला आहे. शुक्रवारी रात्री रुग्णालयात या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे एका ४५ वर्षीय रुग्णाचा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपुरातील पारडी शिवारात राहणा-या एका व्यक्तीला ११ फेब्रुवारी रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती शुक्रवारी सायंकाळी ढासळली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
पारडी परिसरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीला जीबीएस सिंड्रोम आजारामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ११ फेब्रुवारीला दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी या रुग्णावर उपचार सुरू केले. मात्र या रुग्णाला अगोदरच दोन्ही हात आणि पायाला अर्धांगवायू झाला होता. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. शिवाय बीपीचा त्रास असल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. या रुग्णाला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यासह त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यातच त्यांची जीबीएस सिंड्रोम आजाराची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यातच शुकवारी सायंकाळी या रुग्णाची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्े. मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.
आणखी दोन रुग्णांवर उपचार सुरू
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जीबीएस सिंड्रोम आजाराच्या आणखी दोन रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या दोन रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. मात्र नागपुरात जीबी सिंड्रोम आजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.