पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या गुइलेन बॅरे सिंड्रोमने धुमाकूळ घातला असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच आता राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे.
दरम्यान, पुणे, मुंबई, नाशिक पाठोपाठ राज्यातील अनेक शहरांमध्ये जीबीएस आजाराचे थैमान सुरू असून अनेक रुग्ण आढळले आहेत. राज्यातील जीबीएसच्या रुग्णांचा एकूण आकडा हा २११ वर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भीतीच्या सावटाखाली जगत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून सर्वोपचार रुग्णालयात ३७ वर्षांच्या पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. मृत इसम हा सोनवडी (ता. दौंड) येथील रहिवासी होता. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील जीबीएस बाधितांची एकूण संख्या २०० च्या वर पोहोचली आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
अमरावतीतही शिरकाव
सध्या राज्यात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेला जीबीएस या आजाराचा रुग्ण अमरावती जिल्ह्यात देखील आढळून आला आहे. ६५ वर्षीय या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अष्टगाव येथील ही व्यक्ती १२ दिवसांपूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाने दिली. शहरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याने अमरावतीकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.