कोणताही ग्रंथ अथवा वैश्विक विचार हा एखादा धर्म, व्यक्ती अथवा देशासाठी मर्यादित नसतो. काळ नित्य प्रवाही असून विश्वाच्या चलनवलनात सर्वत्र समान विचारांचा प्रवाह नित्य वाहत असतो हे विसरून चालणार नाही. त्याच न्यायाने जगात अनेक महान धुरिणांनी अनेक विचार-ग्रंथांची रुजवणूक करून ठेवली आहे. त्यातील एक म्हणजे श्रीमद् भगवद्गीता! जगात विविध धर्म-विचारांच्या अनुषंगाने बायबल, कुराण, बुद्ध आणि त्यांचा धम्म, जेंद अवेस्ता, गुरु ग्रंथसाहिब या विविध ग्रंथांचे अवलोकन केल्यास हे सर्वच ग्रंथ आपापल्या धर्मातील आणि त्या अनुषंगाने वैश्विक जीवन मूल्य अधोरेखित करताना आढळून येतात. यातीलच एक ग्रंथ म्हणजे श्रीमद् भगवद्गीता होय. इतर सर्वच धर्मग्रंथांची पार्श्वभूमी विभिन्न असून त्यातील श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाची निर्मिती ही मोठी क्रांतिकारी आणि सर्वांना थक्क करणारी आहे.
या ग्रंथाचे कथन म्हणजेच निर्मिती एखाद्या प्रार्थनास्थळी झाली नसून तो प्रत्यक्ष कुरुक्षेत्र या युद्धस्थळी श्रीकृष्ण-अर्जुन यांचा जीवन जगणे-मरणे या विषयावरचा सैद्धांतिक संवाद आहे हे विशेष! प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती प्रश्न-उत्तर धरतीवर झाली आहे. त्यासाठी हा ग्रंथ निर्माण अथवा कथन होताना कोणताही धर्म अथवा व्यक्ती समोर ठेवून नाही तर संपूर्ण मनुष्य आणि त्याने आपल्या जीवनात विविध प्रसंगी करावयाचे वर्तन या संदर्भाने वारंवार विवेचन आले आहे. त्यामुळे हा ग्रंथ सर्वच माणसांच्या सर्वच प्रश्नांची म्हणजेच संसारिक, आध्यात्मिक, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक, सैद्धांतिक उत्तरे देणारा विश्व कल्याणकारी, जीवनदायिनी ग्रंथ आहे असे म्हणणे वावगे ठरू नये! श्रीमद् भगवद्गीता ग्रंथात कुठेही एका विशिष्ट धर्माचा उल्लेख आढळत नसून ती दैनंदिन संसाराच्या युद्धक्षेत्रावरील लढाई लढणा-या माणसांना प्रेरित करणारी, वर्तन करायला लावणारी, लढायला आणि प्रसंगी शांत रहायला शिकवणारी ही एक सर्वोच्च कलाकृती आहे!
श्रीमद् भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण-अर्जुन यांचा अलौकिक संवाद! एकूण ७०० श्लोक असलेल्या या संस्कृत ग्रंथातील सर्वच्या सर्व १८ अध्याय म्हणजे मानवी जीवन जगण्याचे अद्भूत तत्त्वज्ञान विषद करणारा १८ भागांतील नितांत सुंदर ग्रंथ! प्राचीन कालखंडापासून सांप्रत काळापर्यंत अनेक तत्त्ववेत्ते प्रस्तुत ग्रंथाच्या विषय-आशयाकडे आकर्षित झाले आहेत आणि दिवसेंदिवस या ग्रंथाचे अभ्यासक वाढतच आहे. या ग्रंथातील विषय मोठा मजेशीर आहे.
तो तुमच्या-आमच्या रोजच्याच गोष्टींसारखाही आहे आणि जपी-तपी-ऋषी-मुनी-ध्यानी-योगी यांच्या पण कामाचा आहे. या ग्रंथात मूळ ग्रंथ सोडून कालौघात नक्कीच काही श्लोकांची घुसखोरी झाली असावी. या ग्रंथात एकूण चारच पात्र असून त्यांचा एकमेकांशी संवाद होताना दिसतो. हा ग्रंथ म्हणजे श्री कृष्णशिष्टाई असफल झाल्यानंतर पांडवांना आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि आपले अधिकार परत मिळवण्यासाठी युद्ध करणे क्रमप्राप्त होते. इथेही ‘पांडवांनी युद्ध केले नसते तर विनाश टळला असता’ असाही एक मतप्रवाह ऐकायला येतो. परंतु कधी कधी आपले अधिकार मिळवण्यासाठी ‘नाठाळाच्या माथी काठी हाणावी’ लागते. त्याच न्यायाने पांडवांचा मामेभाऊ असलेल्या श्री कृष्णाने या निर्णयाला सहमती दर्शवली असावी. यामुळे या अगोदरही एका लेखात श्री राम आणि श्री कृष्ण हे देव नसून माणूस म्हणून दिव्य काम करणारे महापुरुष आहेत याचे मी प्रतिपादन केले आहे. त्यामुळेच या दोन्ही महान भारतीय नायकांकडून काही चुका सुद्धा घडल्या आहेत हे लक्षात घेणे गरजेचे वाटते. एखाद्याला दैवत्व बहाल केले की; माणूस त्याचे गुण-दोष पहात नाही. त्यामुळे हे दोन्ही महापुरुष होते हेच महत्त्वाचे!
अगोदर युद्धाला तयार झालेले पांडव आणि त्यानंतर आपलेच आप्तेष्ट, गुरू समोर युद्धाला आलेले पाहून अर्जुनाला या सगळ्या गोष्टींचा विषाद येतो आणि इथूनच गीतेचा जन्म होतो. आपल्याच लोकांशी युद्ध करायला प्रवृत्त करण्यासाठी श्री कृष्णाला आपला परम शिष्य अर्जुनाला अनेक नीतितत्त्वे सांगून क्षत्रिय धर्म निभावायला सांगितले. याशिवाय कुरुक्षेत्रावरील इतिवत्ृतांत कथन करण्यासाठी हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र दिव्यदृष्टी लाभलेल्या संजयला विविध प्रश्न विचारून या ग्रंथाच्या प्रश्न-उत्तर भागात समाविष्ट करून घेतलेले आढळून येते. श्रीमद् भगवद्गीता ग्रंथातील सर्वच श्लोक अन् त्यातून समोर येणारे तत्त्वज्ञान हे सार्वकालिक आणि सर्वच मानवांना संसारातील अनेक प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत मोलाचे असे मैलाचे दगड आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
महान तत्त्वज्ञ श्री विनोबा भावे आपल्या ‘गीताई’ ग्रंथात या ग्रंथाविषयी ‘आपले हे भाग्य आहे की; येथे जेवढे धान्याचे पीक येते त्यापेक्षा जास्त येथे ज्ञानाचे पीक आलेले आहे. बारा चौदा संपन्न भाषा येथे आहेत.’ एवढा सर्वांगीण आणि समृद्ध ग्रंथ भारतात अन्य कोणताही मिळणार नाही. याचा अर्थ असा की गीता हा केवळ धर्मग्रंथ नसून एक उच्च कोटीतील ज्ञानाचे भांडार असणारा जीवनदायी अमृत ग्रंथ आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गीता हा समत्व बोधाचा ग्रंथ असून यातून अनेक बाबींचे ज्ञान वाचकांना झाल्याशिवाय रहात नाही. येथे तुम्हाला जीवनात लागणा-या ज्ञान, भक्ती, वैराग्य, आनंद, योग, प्राणायाम, ध्यान आणि जीवन जगण्यास मूलगामी लागणारे धैर्य तत्त्व या ग्रंथात वाचायलाच काय अर्जुनाच्या रूपाने अनुभवायला मिळणार आहे हे महत्त्वपूर्ण म्हणावे लागेल. शिवाय इथे श्रद्धा सर्वोच्च स्थानी विराजमान असून बुद्धीपेक्षा श्रद्धेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आढळून येते. प्रज्ञा हा आणखी एक गीतेचा अलंकार आपल्याला अनुभूतीत येतो.
– प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये,मो. ९१५८० ६४०६८