जेजुरी : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त आज हजारो भाविकांनी देवदर्शन घेत कुलधर्म-कुलाचार केला. भंडा-याच्या उधळणीबरोबरच सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात संपूर्ण गडकोट निनादला.
राज्याच्या विविध प्रांतातून बहुजन बांधवांच्या शिखरी काठ्या गडावर दाखल झाल्या होत्या.
रणहलगी, ढोल- ताशांच्या गजरात विविध रंगांच्या आणि रंगीबेरंगी रेशमी कापडाने मढविलेल्या शिखरी काठ्या गडावर दाखल होताच बहुरंगी-बहुढंगी महाराष्ट्राचे दर्शन येथे घडत होते. तीव्र उन्हाळा, परीक्षांचा काळ यामुळे या वर्षी यात्रेला भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत होते.
चैत्र पौर्णिमा उत्सव हा खंडेरायाचा महत्त्वपूर्ण मानला जातो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुस-या प्रहरी चित्रा नक्षत्र वसंत ऋतू या दिनी शिवशंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. अशी आख्यायिका असल्याने येथे पुरातन काळापासून मोठी यात्रा भरते.
राज्याच्या विविध प्रांतातील बहुजन बांधव व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने येथे दाखल होत येळकोट, येळकोट असा गजर करीत भंडा-याची उधळण करत कुलधर्म-कुलाचार करतात. सालाबादप्रमाणे या वर्षीही उत्सव साजरा करण्यात आला. श्री मार्तंड देवसंस्थान व्यवस्थापनाकडून भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मल्हार गडावर सावलीचे आच्छादन करण्यात आले आहे. गडकोट आवारात थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यभरातून आलेल्या भाविकांनी आपापल्या देवघरातील मूर्ती, देवाचे टाक, आदी देवभेटीसाठी आणले होते. नाझरे जलाशयावर स्रान, कुलधर्म कुलाचार उरकून भाविक गडावर जाऊन देवदर्शन घेत होते. खंडेरायाचे मूळस्थान असलेल्या कडेपठार मंदिरामध्येही चैत्र षडरात्र निमित्ताने स्वयंभू लिंगावर दवण्याची पूजा करण्यात आली. पौर्णिमेचे औचित्य साधून नित्यनेमाची पूजा करताना सुगंधी दवणा वनस्पतीने स्वयंभू लिंग आच्छादण्यात आले. जेजुरी गडावर आज पहाटे श्री खंडोबा मंदिर गाभा-यामध्ये पहाटे भूपाळी झाली, नंतर दवणा पूजा करण्यात आली.