३ मार्चपर्यंत वाढवून दिला वेळ
बीड : प्रतिनिधी
महादेव मुंडे खून प्रकरणात पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी ३ मार्चपर्यंत वेळ वाढवून मागितला आहे. मात्र, त्यानंतर आपण उपोषणाला बसू, कुणाचेही ऐकणार नाही, असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला. ३ मार्चपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर उपोषणावर ठाम राहू, असे त्या म्हणाल्या.
ज्ञानेश्वरी मुंडे या मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. पण आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथिदारांनीच महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दोन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी महादेव मुंडे हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. सोमवारपर्यंत आरोपीला अटक न झाल्यास मंगळवारपासून (उद्या) आंदोलन करण्याचा इशारा महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी दिला होता. पण आता पोलिस अधीक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार ३ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
त्यानंतर पोलिस अधीक्षक किंवा आणखी कुणाचेही ऐकणार नाही. त्यावेळी उपोषण सुरू करू. त्यावेळी एक तर उपोषणाच्या ठिकाणाहून माझी बॉडी तरी येईल किंवा आरोपी अटक होतील, असेही मुंडे म्हणाल्या.