22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रज्याची चर्चा असते, तो मुख्यमंत्री कधीही होत नसतो : विनोद तावडे

ज्याची चर्चा असते, तो मुख्यमंत्री कधीही होत नसतो : विनोद तावडे

मुंबई : विशेष प्रतिनिधी
महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूने प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले असले तरी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजू्च्या पक्षांकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. ज्या पक्षाच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री असे सूत्र आगामी काळात निवडणुकीनंतर ठरण्याची शक्यता आहे.

महायुतीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न भाजप नेते विनोद तावडे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. याचाच अर्थ भाजप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जर निकाल महायुतीच्या बाजूने आला तर पक्ष धक्कातंत्राचा अवलंब करत कुठल्यातरी नव्या चेह-याला मुख्यमंत्रीपदासाठी संधी देणार का? असा प्रश्न तावडे यांच्या वक्तव्याने निर्माण झाला आहे.

भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेह-याबाबत राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ज्या नावांची चर्चा असते ते मु्ख्यमंत्री होत नाहीत, असं विनोद तावडे म्हणाले. माझ्या नावाची चर्चा मग मी मुख्यमंत्री होणार नाही हे नक्की, असं विनोद तावडे म्हणाले. राजस्थान आणि मध्य प्रदेशात तुम्ही पाहिलेलं आहे, असं उदाहरण देखील विनोद तावडे यांनी दिलं. मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नावाची चर्चा असते ते कधी मुख्यमंत्री होत नाहीत हे पक्क लक्षात ठेवा. तुम्हाला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा माहिती होते का? मध्य प्रदेशचे मोहन यादव माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा होतेय तर मी नक्की होणार नाही. बाकी बघू, असे वक्तव्य विनोद तावडे यांनी केले.

महायुतीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जनतेचा लाभ करून दिला आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, पायाभूत विकास यापासून सामान्य नागरिकांना लाभ होत आहे. लाडकी बहीण योजना, शेतक-यांना विजेचं बिल येणार नाही, विद्यार्थ्यांना १० हजारांचा लाभ, उज्वला योजना अशा अनेक योजना सरकारने अंमलात आणल्या आहेत, असे विनोद तावडे म्हणाले.

मध्य प्रदेशमध्ये असताना माध्यमांमध्ये बघितले मविआ नेत्यांनी गद्दारांचा पंचनामा केला म्हणे. मात्र गद्दारी कुणी केली? २०१९ ला महायुती म्हणून मते मागितली. निकालानंतर विरोधी लोकांसोबत आघाडी केली. यावरून जनतेसोबत आणि मतांसोबत गद्दारी कुणी केली? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर सगळं काही घडलं. यामुळे गद्दारांचा पंचनामा करायचा असेल तर ठाकरेंनी आरसा बघावा, असा टोला विनोद तावडे यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR