17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरज्येष्ठांचे पहिले मराठी साहित्य संमेलन लातूरला

ज्येष्ठांचे पहिले मराठी साहित्य संमेलन लातूरला

लातूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक संघाचे (फेस्कॉम) राज्यस्तरीय अधिवेशन लातूर येथे याच महिन्यात यशस्वी पद्धतीने पार पडल्यानंतर आता ज्येष्ठांचे पहिले मराठी साहित्य संमेलन लातूर येथेच येत्या ५ फेब्रुवारी रोजी आयोजिण्यात आले.
या संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा मराठीतील नामवंत समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि ज्येष्ठ नागरिक संघ, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे एक दिवसीय साहित्य संमेलन सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली  येथील डॉ. भालचंद्र ब्लड बॅन्क  सभागृहात संपन्न होईल व  सकाळी ८.३० वाजता निघणा-या ग्रंथदिंडीने संमेलनास प्रारंभ होईल, असे संमेलनाचे कार्यवाह प्रकाश घादगिने यांनी सांगितले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे असून, प्रमुख अतिथी म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे, समतावादी सांस्कृतीक चळवळीचे अध्यक्ष डॉ. माधव गादेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. एन. बोडके, साहित्यिक विलास सिंदगीकर, ज्येष्ठ नागरिक संघाच्या लातूर शाखेचे अध्यक्ष अभि. आर. बी. जोशी आणि प्रकाश घादगिने हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात ‘समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठांचे योगदान’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिसंवादात वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, साहित्यिक प्रा. डॉ. राजशेखर सोलापुरे, ज्येष्ठ युरॉलॉजिस्ट डॉ. हंसराज बाहेती, सामाजिक कार्यकर्ते रामानुज रांदड हे सहभागी होणार आहेत. परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. बी. आर. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तिस-या सत्रात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कथाकथन कार्यक्रमात साने गुरुजी बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखिका वृषाली पाटील, कथाकार चंद्रशेखर कलसे, ज्येष्ठ कथाकार जी. जी. कांबळे सहभागी होतील. सूत्रसंचालन डॉ. भास्कर बोरगावकर यांच्याकडे राहील.
चौथ्या सत्रात कवी प्रा. फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कविसंमेलनात सुरेश गीर, रमेश चिल्ले, जयप्रकाश दगडे,  हाशम पटेल, सुभद्रा घोरपडे, नरसिंग इंगळे, अ‍ॅड. जहिरोद्दीन सय्यद, रामदास कांबळे, कल्याण राऊत, सुनिता बोरगावकर, शालिनी पाटील,  रमेश हणमंते, शैलजा कारंडे, तहसीन शेख, मंगला सास्तुरकर, उर्मिला भालके, उषा भोसले, विजया भणगे, डॉ. श्रीपाद ढवळे, देविकुमार पाठक आदी नव्या, जुन्या कवींचा सहभाग आहे. या कविसंमेलनाचे सूत्रसंचलन कवी भारत सातपुते करणार आहेत. संमेलनाध्यक्ष डॉ. नागोराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखालील समारोप सत्रास प्रसिद्ध विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे , प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य धनंजय गुडसुरकर, आर. बी. जोशी, प्रकाश घादगिने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारोपसत्राचे सूत्रसंचालन अभियंता महेंद्र जोशी करतील. साहित्य संमेलनाच्या मेजवानीचा साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाने केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR