मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने आज १५ जुलै राजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
धीरज कुमार यांनी १९६५ साली आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केली. ८० च्या दशकात त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. सुभाष घई आणि राजेश खन्ना यांच्यासोबत ते एका टॅलेंट शोच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. या शोचे विजेते राजेश खन्ना ठरले होते. १९७० ते १९८४ या काळात त्यांनी २१ पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. त्यांनी ‘हिरा पन्ना’ आणि ‘रातों के राजा’ या चित्रपटांतही काम केले होते.
१९७४ साली ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शकाचीही भूमिका साकारलेली होती. त्यांनी त्या काळातील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. धीरज यांनी ‘क्रिएटिव्ह आय’ नावाने निर्मिती कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या बॅनरअंतर्गत ओम नम: शिवाय, श्री गणेश, जय संतोषी माँ, जप तप व्रत यांसारख्या लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे.