नवी दिल्ली : देशव्यापी राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी सत्तेच्या लालसेपोटी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर आता राजस्थानमधील भाजपचे ज्येष्ठ नेते किरोडीलाल मीणा यांना काँग्रेस नेत्याकडून काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली गेली आहे. टोंकचे खासदार हरिश मीणा यांनी किरोडीलाल मीणा यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली असून, मीणा यांना काँग्रेसमध्ये आल्यास उचित सन्मान मिळेल, असे वक्तव्य खासदार हरिश मीणा यांनी केले आहे. यामुळे राजस्थान भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
भाजपच्या राजवटीत जनतेची अवस्था बिकट असून, लोक वीज आणि पाण्याच्या समस्यांमुळे चिंतेत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत राजस्थानमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तर भाजपचे ज्येष्ठ नेते किरोडीलाल मीणा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आला आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे किरोडीलाल सध्या संभ्रमात आहेत. अशातच नाराज किरोडीलाल मीणा यांना काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली आहे.
भाजपकडून ज्येष्ठ नेत्याचा अपमान : खासदार मीणा
दरम्यान, किरोडीलाल यांच्याबाबत बोलताना खासदार हरिश मीणा म्हणाले की, किरोडीलाल हे भाजपचे मोठे नेते आहेत, त्यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. एवढा मोठा नेता असूनही भाजपामध्ये त्यांचा अपमान केला जातो. हे पाहून मला खूप वाईट वाटते. किरोडीलाल यांनी भाजपा सोडल्यास काँग्रेस त्यांना आनंदाने स्वीकारेल आणि त्यांचा योग्य सन्मान करेल, असे काँग्रेस खासदाराने म्हटले.